Total Pageviews

Saturday, December 24, 2011

शिशु शिक्षणाचा बोबड उद्योग

आपल्या तीन-चार वर्षांच्या चिमुकल्याने आयुष्यात प्रगती करावी असे वाटत असेल तर पालकांनी आधी त्याला स्वत:ची घसेफोड करून ‘एबीसीडी’ किंवा ‘वन-टू-थ्री’ शिकविणे थांबवावे. हे शिकवायला शाळा आहेत. त्याऐवजी पालकांनी शब्दसंग्रह वाढण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांना गोष्टी वाचून दाखवाव्या. घराबाहेर अंगणात, बागेत, पाणी, चिखल, वाळू, झोपाळा यांच्याशी मनसोक्त खेळू द्यावे. कणिक, वॉटरकलर्स, फिंगर पेन्ट अगदी शेव्हींग क्रीमनेही मुलं चांगल्या पद्धतीने खेळतात. म्हणजेच काय त्यांच्या अभिव्यक्तीत व्यत्यय न आणता तुम्ही त्यांना मनसोक्त खेळू द्या - अमेरिकेतल्या जुडी आणि टोनी प्रिव्हेट नामक एका अवलिया दांपत्याने संपादीत केलेल्या ‘व्हॉट अमेरिकन्स टिचर्स विश पेरेन्ट्स न्यू’ नामक पुस्तकात एका किंडरगार्डन शिक्षिकेने हा सल्ला पालकांना देऊ केला आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांना त्यांच्या शिक्षकांना कोणती एक गोष्ट सांगावीशी वाटते, या ‘थीम’वर प्रिव्हेट दांपत्याने या प्रतिक्रिया मागविल्या होत्या. पण, मोजक्याच शब्दातील शिक्षकांच्या थेट आणि बिनधास्त सूचना जगातील समस्त पालकवर्गाच्या डोळ्यात जळजळीत अंजन टाकणाऱ्या आहेत.
आजकालचे पालक आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी जागरूक आहेत. पण, कधीकधी हा जागरूकपणा ‘अतिपणा’कडे झुकू लागतो आणि मुलं आणि पालक या दोघांचंही कसं कठीण बनून जातं, यावर या पुस्तकातील शिक्षकांच्या तिखट प्रतिक्रियांनी चांगलाच प्रकाश पडतो. आपल्या मुलांना अकाली ‘शिक्षित’ करण्याच्या या गडबडीत पालकांचा खिसा रिकामा होतो आणि मुलांचं बालपण. पालकांचं होणारं नुकसान भौतिक स्वरूपाचं असतं. पण, आपल्या अपेक्षांचे ओझं मुलांवर लादून त्यांना लवकरात लवकर ‘शिकती’ करण्याच्या पालकांच्या भूमिकेमुळे मुलांची बौद्धिक, मानसिक, भावनिक, शारीरिक अशी चोहोबाजूंनीच कोंडी होत असते.

Monday, October 10, 2011

टीव्हीच्या अतिरेकामुळे लहान मुलांच्या मनावर आणि शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांची कितीही चर्चा होत असली  तरी  टीव्हीवेड काही कमी होताना दिसत नाही. गेल्याच आठवडय़ात हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासकांनी काढलेल्या निष्कर्षांत दररोज दोन तासांहून अधिक काळ टीव्ही बघत राहिल्याने मधुमेह आणि हृदयविकार निर्माण होतात. अमेरिकन ‘अ‍ॅकेडमी ऑफ पेडिअ‍ॅट्रिक्स काऊन्सिल’ने नव्या अहवालाद्वारे टीव्ही केवळ शारीरिक हालचालीच कमी करीत नाही, तर खाद्यपदार्थाच्या जाहिराती मुलांच्या खाण्याच्या सवयी बिघडवू शकतात, असा इशारा दिला आहे.लहान मुलांमधील स्थूलत्त्व, ड्रग्ज, िहसक, गुन्हेगारी वृत्ती, अभ्यासातील पीछेहाट या सर्वाना टीव्ही जबाबदार असल्याचे  ‘अ‍ॅकेडमी ऑफ पेडिअ‍ॅट्रिक्स काऊन्सिल’ने अहवालात म्हटले आहे. अमेरिकी व्यक्ती साधारण पाच तास टीव्ही पाहते. मात्र जगभरातील लहान मुले मोठय़ा माणसांहून दोन तास अधिक टीव्ही पाहातात, असे समोर आले आहे.   

Friday, July 8, 2011

शाळा!

त्याला वाटलं, अजून थोडं झोपून राहावं. थोडंसंच. दहा मिण्टं. डोळेही न उघडता तो पोटावर आणखी पसरला. पांघरुण घट्ट ओढून घेत आणखी थोडी ऊब गोळा केली. अर्धवट झोप आणि अर्धवट जाग यांच्या कुंपणावरच सोसाटय़ाचा वारा यावा, तसा विचार त्याच्या मनात घुसला- आज शाळेचा पहिला दिवस.. श्शी!
पांघरुणातल्या पांघरुणात तो उदास होत गेला आणि त्या औदासीन्यानं त्याला झोपेतून बळेच ओढून काढलं. तेवढय़ात आई आलीच उठवायला.
‘‘उठतोयस नं रे.. शाळेत जायचंय आज!’’ आईनं घेतलेली पापी आज खूप गोड वाटली नाही. खांदा हिसडून तो अंथरुणात अधिकच मुरला. आई आणखी एक-दोन पाप्या घेऊन दोन-चार मिनिटं झोपू देईल. मग मात्र..
दात घासायला ब्रशवर टूथपेस्ट देऊन आई स्वैपाकघरात गेली. दात घासणं थांबवून तो आरशात खुळ्यासारखा पाहात राहिला. एक किडमिडीत बुटका मुलगा त्याच्याकडे झोपाळू नजरेनं बघत होता.
येडा आहेस येडा! बघतो काय असा डुक्करसारखा? शाळेत जा गुपचूप..!! मनातल्या मनात तो ओरडला. तोंडं वेडीवाकडी करून पाहिली. टूथपेस्टचा भरपूर फेस येऊनही आज दात घासताना मजाच नाही आली! डोळ्यातली चिपाडं काढण्याचा प्रयत्न मग त्यानं केलाच नाही. तेवढय़ात घाईनं आलेल्या आईनं भराभरा त्याचा चेहरा स्वच्छ धुतला. नाक शिंकरून घेतलं. भराभरा त्याचे कपडे काढून टाकत ऊन ऊन पाणी त्याच्या अंगावर ओतलं. साबणाचा सुगंध त्याला एरवी जाम आवडतो. आज नेमका तो डोळ्यात गेला. हातातल्या प्लास्टिकच्या मगाने त्यानं आईलाच मारायचा क्षीण प्रयत्न केला. डोळ्यात झोंबत होतं, आणि मनात प्रच्चंड चीड आली होती. न्हाणीघराच्या दरवाजात अध्र्या चड्डीत शिट्टय़ा मारत हसत उभ्या असलेल्या बाबाला बघून तर त्याचं डोकंच सटकलं. या दोघांनाही बेडूक केलं पायजे!
टॉवेलात गुंडाळून खसाखसा पुसत त्याला पुन्हा आरशासमोर आणण्यात आलं. इस्त्री केलेला नवाकोरा युनिफॉर्म अंगावर चढवताना खरं तर त्याला छान वाटलं होतं, पण रागामुळे तसं काही त्यानं दाखवलं नाही. ‘‘पहिलाच दिवस आहे आज.. लौकर सोडतील!’’ त्याचा भांग पाडत आईनं समजूत काढली, ‘‘बाबा थांबेल बाहेर तोवर. काळजी करू नकोस. पण झालीच दिवसभर शाळा तर रडत बसायचं नाही. डब्यात छान खाऊ देतेय तुला. कळलं का शंभ्या!’’
आई असं बोलायला लागली की का कुणास ठाऊक, ओठ बाहेर बाहेर येतो. श्वास जोरात येऊन हुंदकाच येतो. खरं तर रडू येत नसतं. पण मग असं का होतं? गटागटा दूध पिऊन तो निघणार होता. पण त्याला दूध अजिबात आवडलं नाही. मळमळत होतं, रडवेल्या सुरात त्यानं आईला विचारलं, ‘‘आई मला शाळेत ओकी होईल?’’
‘‘छे रे, ओकी कशानी होईल? पावसाळी हवा आहे नं. म्हणून वाटतंय तुला असं!’’, आईनं पुन्हा समजूत घातली.
दफ्तर पाठीला अडकवून तो निघाला तेव्हा पाऊस नुकताच पडून गेला होता. रस्ते ओले होते. मोटारींचे हॉर्न नेहमीपेक्षा मोठय़ांदा वाजत होते. बाबाचा रेनकोट घट्ट पकडून तो बाईकवर बसला.
शाळेसमोर खूप छत्र्या आणि खूप रेनकोट होते. रंगीबेरंगी गर्दी. खूपच गोंगाट होता. शाळेचा शिपाई एकेका मुलाला गेटमधून आत सोडत होता. बाबाचं बोट धरून तो बावळटासारखा बघत राहिला.
‘‘काय साहेब, जायचं का वर्गात?’’ त्याच्या डोक्यावर नाजूकशी टप्पल बसली, म्हणून त्यानं मान मागे टाकत वर पाहिलं. सुंदर हसत बाई त्याच्याकडे होत्या. बाबाशी ओळखी ओळखीचं बोलत त्या म्हणाल्या, ‘‘डोण्ट वरी. आम्ही खूप मज्जा करणार आहोत शाळेत. हो की नाही रे!’’
मान डोलवावी, की न डोलवावी, या संभ्रमात असतानाच बाईंच बोट पकडून तो आत कधी गेला ते त्यालाही कळलं नाही. गेला तो चक्क रमलाच!
बाईंचं ते बोट मग बरीच र्वष सुटलंच नाही. खरं तर अजूनही नाही सुटलेलं!

Saturday, April 16, 2011

प्रार्थना कशासाठी करावी.

प्रार्थनेत मागताना अशा गोष्टी मागा की ज्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही डॉक्टर व्हावे म्हणून जर प्रार्थना केलीत आणि तुम्ही आंधळे असाल किंवा पॅरालिटिक असाल तर तुम्ही तेथे जाऊन पोहोचणारच नाही. अर्थात त्या क्षेत्राशी संबंधित कार्य करण्याची संधी तुम्हाला नक्की मिळू शकेल.
तुम्ही आर्टसचे स्टुडन्ट असाल आणि वैज्ञानिक व्हायची इच्छा कराल तर तुम्हाला एखाद्या वैज्ञानिक संशोधन केंद्रात नोकरी नक्की मिळेल. प्रार्थना तुम्हाला इच्छेच्या जवळपास नक्की नेऊन पोहचवेल, परंतु जर तुम्हाला पूर्ण यश हवे असेल तर त्या गोष्टीची अपेक्षा करा की, ज्या गोष्टीसाठी तुमची मानसिक आणि शारीरिक क्षमता असेल. आर्थिक क्षमता तुम्हाला प्रार्थना प्रदान करेल.
तुमचा शैक्षणिक प्रवास एका क्षेत्रातील असेल व तुमचे ध्येय दुसऱ्या क्षेत्रातील असेल व प्रार्थना करण्याची तुमची चिकाटी व ध्येयापर्यंत जाण्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची तुमची तयारी असेल तर प्रार्थना तुम्हाला अनेक मार्ग उपलब्ध करून देईल.

Thursday, April 14, 2011

शिबीर!

लहानपणाची एक आठवण त्याच्या स्मरणात अजून आहे. कधी ती अंधूक आठवते. कधी ठळक स्पष्ट डोळय़ांना दिसते. हे गौडबंगाल त्याला काही कळत नाही. तेव्हा तो काही फार लहानगा नव्हता. असेल बारा नाही तर तेराचा.. दूर कुठल्यातरी प्रदेशात होणाऱ्या शिबिराला त्याला पाठवा, असं एक ओळखीचे काका सांगून सायकलवर टांग टाकून निघून गेले, आणि ते सगळं सुरू झालं..
‘‘इतक्या लांब कुठे पाठवणार? किती लहान आहे तो.. तुझं आपलं काहीतरीच!’’, बाबांनी आईला पहिल्यांदा उडवूनच लावलं, ‘‘ हे कॅम्प वगैरे भंकसबाजी असते सगळी.. पैसे काढायची लाइन! तुमची पोरं पाठवा, वर हजारो रुपये पण आमच्या बोडख्यावर ओता. हज्जारो रुपये घेऊन हे आमच्या पोरांना तंबूत झोपवणार, आणि बटाटय़ाची भाजी नि तेलकट पुऱ्या खायला घालणार! मरो तो कॅम्प आणि ट्रिप. इथेच घाल कुठल्या तरी क्रिकेट शिबिरात!’’
आई दुग्ध्यात पडली. पाठवावं की राहू दे यंदा? आजवर कधी आईला सोडून फारसा राहिलेला नाही. क्वचित कधी आज्जीआजोबांबरोबर दोनेक दिवस राहिला तर. पण बाकी हे पोर अंगाखांद्यावरच आहे अजून. पण असं किती दिवस राहणार? कॅम्पमध्ये गेला तर चारचौघांत राहून काही जगरहाटीचा अंदाज येईल. उघडय़ावरचे खेळ खेळून थोडा कणखर होईल. ती पंजाबी नि गुजराथ्यांची मुलं कशी चलाख असतात. कॅम्पला जातील. स्पर्धामध्ये उतरतील. क्रिकेट शिबीर. नाटय़शिबीर. गाणी. नाच.. नटतील. मुरडतील. सगळं करतील. आपलीच मुलं अशी मागे राहतात.
कॅम्पला त्याला पाठवायचंच. फायदा नाही झाला तर नाही झाला, नुकसान तर काहीच नाही, पैशाचं सोडलं तर.. असा कौल आईनं दिल्यावर अचानक बाबा कॅम्प चांगला असतो, धम्माल येते वगैरे बोलायला लागला! त्याला आश्चर्यच वाटलं. कॅम्प म्हणजे एक ट्रिप असते. ट्रेननं लांब जायचं आणि तिथे भरपूर चालायचं. खेळायचं. गाणीबिणी म्हणायची. मुख्य म्हणजे आपलं सगळं एकटय़ानं करायचं. आपली बॅग सांभाळायची. रोजचे कपडे त्यात स्वत: घडय़ा घालून ठेवायचे. पांघरूण लाथाडून तसंच उठायचं नाही. उठायची वेळ झाली की इमानदारीने उठायचं. स्वत:च्या टूथब्रशवर स्वत: टूथपेस्ट लावायची! भरपूर दूध घातलेल्या चहात बुडवायला क्रीम बिस्किटं नसली तरी ओरडायचं नसतं तिथे.
खूप चालायचं रोज. खेळ खेळायचे.. इट्स ओके. जायला काही हरकत नाही, असं त्याला वाटलं. बाबांनी पण मस्त वर्णनं करून कॅम्पमधल्या मजा मजा आधीच सांगून टाकल्या होत्या. आई मात्र गप्प होती.
रेल्वे स्टेशनात कॅप घातलेले एक काका हातात कागद घेऊन पेनानं काही खुणा करत उभे होते. बाबांनी त्यांना ‘हाय’ केलं. त्यांनीही ‘नमस्कार’ म्हणत याच्या डोक्यावर टप्पल मारली. ‘‘झाली का तयारी, चिरंजीव? जायचं ना?’’ त्यानं मान डोलावली. त्यावर ते काका म्हणाले, ‘‘ हो काय हो? तुझी बॅग आधी घे पाहू बाबांकडून! इथून पुन्हा परतेपर्यंत तुझी तूच सांभाळायचीस, चालेल?’’ त्यानं परत मान डोलावली. इतर मुलं आपल्या आई-बाबांबरोबर येत होती. काकांना भेटून घाईघाईनं पुढे डब्याकडे जात होती. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून बाबांनी त्या काकांना बऱ्यापैकी पिडल्यावर ते डब्याकडे आले. डब्याच्या दरवाजाचा तो उंच पिवळा दांडा धरून तो तीन पायऱ्या चढून आत गेला..
..हिरवळीच्या सुंदर उतारावरचे काही तंबू. दूरवर दिसणारे निळेनिळे डोंगर. थोडय़ाशा अंतरावर खालच्या बाजूला खळाळत वाहणारी चिमुकली नदी. काही झोपडय़ा. माळावर चरणारी गायीगुरं. तंबूतंबूतून येणारे खिदळण्याचे ओरडण्याचे आवाज. एका तंबूबाहेर पेटलेलं चुलाण आणि त्यावर बनणारा शिरा. त्याला वाटलं, आपण या घटकेला ग्रीटिंगकार्डातच राहतो आहोत! मस्त सीनसीनरीचं ग्रीटिंगकार्ड. जिथं कितीही भांडणं झाली तरी रुसायला होत नाही. कितीही चाललं, मस्ती केली तरी दमायला होत नाही. कितीही खाल्लं तरी पोट काही भरत नाही. एरवी ‘यकी’ लागणारा उपमा इथे किती टॉप लागतो. मित्रांबरोबर धमाल करत राहण्यातच खरी मजा आहे.. तो परत आला. आईबाबांना भेटला, तेव्हा त्याला त्यांना पाच हजार पाचशे बेचाळीस गोष्टी सांगायच्या होत्या. आणि हो, त्यानंतर त्यानं चहा पिणंही सोडलं आपोआप.
त्या कॅम्पमध्ये त्याची स्वत:चीच स्वत:शी चांगली मैत्री झाली.
आता तो दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचे कॅम्प्स नेतो. रेल्वे स्टेशनावर कॅप घालून हातात कागद घेऊन लहानग्यांना विचारतो, ‘‘झाली का तयारी, चिरंजीव? जायचं ना?’’

Tuesday, March 1, 2011

बदलत्या जीवनशैलीतही योगाभ्यास उपयुक्‍त

योग अभ्यासाने शारीरिक आणि मानसिक पातळीवर उत्तमरीत्या समतोल राधल्यास निरोगी व्यक्‍तिमत्त्व लाभते, हे आता पटू लागल्याने योगाभ्यासाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. योगविद्या परदेशात लोकप्रिय होत असल्याने भारतीयांनाही आता त्याचे महत्त्व पटू लागले आहे.
विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच योगाभ्यास उपयुक्‍त ठरत असल्याने, परीक्षा, घरगुती समस्या, आणीबाणीच्या प्रसंगी योग करणारी व्यक्‍ती एकदम टोकाची भूमिका न घेता समन्वयाची भूमिका घेते. शरीरातील सर्व यंत्रणा सुरळीत होत असल्याने तसेच प्रत्येक अवयवाला व्यायाम लाभल्याने रक्‍तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढून दिवसभर उत्साह टिकून राहतो.

आजकाल कामाच्या गरजेनुसार सतत बसल्याने अंगदुखी, पाठदुखीसारखे विकार उद्‌भवतात. शरीराची हालचाल कमी होते. अशा वेळी योगासने केल्यास शरीर तंदुरुस्तीबरोबर मन:शांती लाभते. समाधानी वृत्ती वाढते.

सूर्यनमस्कारामुळे तर सांध्याचे विकार जवळदेखील फिरकत नाहीत. योगासनाला परस्परपूरक असलेल्या प्राणवायूमुळे आजूबाजूच्या हवेत, वातावरणात कितीही बदल झाला तरीही सर्दी, पडसे, खोकला यांसारखे आजार होत नाहीत. प्रतिकारशक्‍ती वाढते. मानवी शरीरातील चक्रे आणि ग्रंथी या निद्रित अवस्थेत असतात. योगासनांमुळे त्या जागृत होता. कामाच्या व्यापात शरीर कमालीचे बेशिस्त बनते. योगामुळे सर्व क्रिया या वेळेत पार पडत असल्याने आपोआपच जीवनात शिस्तबद्धता येते.

शरीराला प्रामुख्याने सात्त्विक आहाराची गरज असते. पण तसे न होता- विशेषत: तरुण मुलांकडून काहीही खाण्याचे प्रमाण वाढत आहे. खाण्याच्या अनियमित वेळा आणि व्यसनांमुळे शरीराचा समतोलच बिघडून जातो. अशा वेळी नियमित योगासने केल्याने भोग आणि योग एकत्र राहूच शकत नाहीत. या उक्‍तीप्रमाणे व्यसनमुक्‍ती मिळू शकते आणि पचनक्रियाही योग्य रीतीने कार्यान्वित होते. अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी लठ्ठपणाने ग्रासलेले दिसते. अशा वेळी योगाभ्यासाने शरीरातील सर्व अवयवांना पुरेसा व्यायाम मिळाल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

"सहजता, समज आणि सातत्य' या त्रिसूत्रीनुसार योगाचे कार्य चालते. धावपळीच्या जीवनात माणसाची उडणारी त्रेधातिरपिट पाहता, तंदुरुस्त मन आणि
शरीरासाठी योगाभ्यासाची नितांत गरज वाटते.

Sunday, January 23, 2011

ओढ जीवनाची.....

ओढ जीवनाची.....
जीवनाच्या कित्येक घड्या, एक एक घडी उलगडताना "तिचं" आयुष्यं वेगळं....
उलगडणारी घडी, पुन्हा बसेलच का? - ह्याची शाश्वती नाही.....
पण;
प्रत्येक घडी उलगडताना, उत्सुकता मात्र पराकोटींची!
एका ठिकाणी थांबून राहिलेलं, संथ वाहणारं किंवा अडचणींनी अडलेलं - आयुष्यं प्रिय नसतं!   
हवा खळखळाट!!
उथळ पाण्यासारखा नव्हे- तर हास्याचा- कधी अश्रूंचा....... कधी गप्पांचा  तर कधी गाण्यांचा!!!
आयुष्य 'सुगंधी" आहे...
फक्त ही "जाणीव" जपावी लागते.....
जगणं "वाहत्या"  पाण्याजोगं  असावं....
फक्त ती "गती" जपावी लागते.....

Sunday, January 16, 2011

‘लिहावे नेटके’

मराठीचा ‘गंध’ लावणारे हल्ली बरेच भेटतात. पण अशांना मराठीचा गंध असतोच असं नाही. त्यांनाही ते ठाऊक असतं. ‘अक्षराला हसू नये’ ही वृत्ती आत्मविश्वास नसल्याचं प्रतीक आहे; तर ‘मराठी लिहायची सवय नाही, त्यामुळे ऱ्हस्व-दीर्घ सांभाळून घ्या,’ असं म्हणणं भाषेला कमी लेखणंच असतं. तरीही अशा मराठीचा कैवार घेणाऱ्या शिलेदारांना गमावून तर चालणार नाही.
‘लिहावे नेटके’चा पुस्तकसंच वाचताना तो विद्यार्थी दशेतल्या मुलांबरोबरच ज्यांनी मराठीची हेळसांड केली आहे, अशा लोकांनाही द्यावा, असं पट्कन मनात येतं.
माधुरी पुरंदरेंनी मराठी भाषा नीट लिहिता-वाचता यावी म्हणून अतिशय परिश्रमपूर्वक दोन खंड तयार केले आहेत.
प्रथम एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. खंड वगैरे म्हटलं की वाचक आधीच भांबावतो. ही मराठी भाषा शिकवणारी पुस्तकं असली तरी व्याकरण शिकवणाऱ्या जड पुस्तकासारखी नाहीत. चित्रं, फोटो, चौकटी, चिन्हांकित सूचना, अतिशय सोपे गाळलेल्या जागा भरण्याचे स्वाध्याय आणि नेटकी दर्जेदार निर्मिती हे या पुस्तकांचं वैशिष्टय़. पूर्वी ‘हाऊस ऑफ सोविएत कल्चर’च्या वतीने मूळ रशियन पण मराठीत अनुवादित केलेली अशी चित्रमय दर्जेदार पुस्तकं असायची. ‘लिहावे नेटके’चा संच पाहून त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
हा संच ज्योत्स्ना प्रकाशन, वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र, पुणे आणि सर रतन टाटा ट्रस्ट इनिशिएटिव्हच्या ‘पराग’ या शैक्षणिक अभिनव प्रकाशनांच्या उत्तेजनासाठी निर्माण केलेल्या उपक्रमातर्फे प्रकाशित झाला आहे. म्हणूनच इतका दर्जेदार पुस्तकांचा संच अवघ्या ४०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
मराठी शिकणाऱ्यांसाठी, मराठी शिकवणाऱ्यांसाठी आणि मराठीचा वापर करणाऱ्या सर्वासाठी हा पुस्तकसंच उपयुक्त आहे. भाग १, भाग २ आणि उत्तरांची पुस्तिका असा हा संच आहे. या पुस्तकांच्या पाठी पुस्तकांच्या निर्मितीच सार लिहिलेलं आहे. ते असं..
‘‘भाषा हा केवळ कथा-कादंबऱ्या-कविता लिहिणाऱ्यांसाठी राखून ठेवलेला प्रांत नव्हे. प्रत्येकालाच आपापल्या क्षेत्रात, आपापल्या व्यवसायात भाषेचा वापर नेटकेपणे करता यावा लागतो, योग्य प्रकारे आणि आत्मविश्वासाने बोलता आणि लिहिताही यावे लागते. भाषा मुळातच कच्ची राहिली, तर कोणताही विषय नीट समजणे कठीण होऊन बसते; इतर भाषा शिकतानाही खूप अडचणी येतात.
म्हणून लेखन सुधारण्यासाठी मुलांना उपयोग व्हावा आणि त्यांना मदत करणे मोठय़ांना सोपे व्हावे, अशा उद्देशाने ‘लिहावे नेटके’ हा पुस्तकांचा संच तयार केला आहे.
मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून पुढच्या मुलांना ह्या पुस्तकांचा उपयोग होईलच, शिवाय इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनाही आपली मराठी भाषा सुधारण्यासाठी ह्या पुस्तकांचा चांगला उपयोग होऊ शकेल. ’’
वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र गेली तीस वर्षे ग्रामीण भागातील शिक्षणक्षेत्रात काम करीत आहे. ‘गाव तेथे बालवाडी’ हा त्यांचा उपक्रम. संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष निर्मला पुरंदरेंच्या मते, ‘‘बालवाडय़ा आणि छंदवर्गाच्या माध्यमातून इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही संस्था काम करते. पण केवळ पारंपरिक शिक्षण नाही तर खेळ, कला, छंद, सामाजिक उपक्रम या गोष्टींची गोडी मुलांना लावली जाते. तसंच शालेय अभ्यासाच्या प्रगतीच्या दृष्टीने वाचन, लेखन, वक्तृत्व व एकूणच अभिव्यक्ती सुधारण्याचा प्रयत्न ह्या वर्गामध्ये होत असतो. त्यासाठीच्या शैक्षणिक साहित्याच्या गरजेतून ‘लिहावे नेटके’ या पुस्तकसंचाची निर्मिती झाली. संस्थेबाहेरच्या सर्वच मुलांना आणि पालक-शिक्षकांनाही त्याचा लाभ व्हावा म्हणून मग त्याची व्याप्ती वाढवली गेली.’’
पुस्तकसंचाच्या लेखिका आणि सादरकर्त्यां माधुरी पुरंदरे वाचकाला उद्देशून सांगतात, ‘‘स्वत:चे अनुभव लक्षात घेऊन बरीच खटपट करून मी हे पुस्तक तुझ्यासाठी तयार केले आहे. तुलाही नेहमी भाषेचा वापर करावा लागतो. शाळेतच नव्हे, तर एरव्हीही लिहावे-बोलावे लागते. ते करताना तुझ्याकडून कमीत कमी चुका व्हाव्यात, तुझा आत्मविश्वास वाढावा ह्यासाठी तयार केलेले भाषेचे व्यायाम ह्या पुस्तकात दिलेले आहेत. हे काही फक्त व्याकरणाचे पुस्तक नाही; किंवा खरे तर ते व्याकरणाबद्दल थोडे आणि भाषेबद्दल अधिक सांगणारे आहे. भाषेबद्दलच्या झाडून सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत असे माझे बिलकुल म्हणणे नाही. शाळेत भाषेचा अभ्यास करताना ती उत्तरे तुला मिळतीलच. पण अनेकदा असे होते, की एकीकडे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास वाढत चाललेला असतो आणि त्याच वेळी काही साध्या गोष्टी कच्च्या राहून जातात. त्या घटवून, सराव करून पक्क्या करण्यासाठी तुला या व्यायामांचा उपयोग होऊ शकेल आणि वाढत्या अभ्यासाचे वजन पेलण्यासाठी तुझी थोडी जास्त तयारी होईल.
भाषा हा केवळ कथा-कादंबऱ्या-कविता लिहिणाऱ्यांसाठी राखून ठेवलेला प्रांत नव्हे. प्रत्येकालाच आपापल्या क्षेत्रात, आपापल्या व्यवसायात भाषेचा वापर नेटकेपणे करता यावा लागतो, योग्य प्रकारे आणि आत्मविश्वासाने बोलता आणि लिहिताही यावे लागते.
हे सगळे व्यायाम ‘प्रमाण मराठी’ भाषेसाठी तयार केलेले आहेत. सर्वाना कळेल अशी मराठी आपल्याला वापरावी लागते. तिला ‘प्रमाण मराठी’ असे नाव आहे. तू शाळेत शिकत असलेली, वर्तमानपत्रातील किंवा पुस्तके-मासिकांमधील, रेडिओ-चित्रवाणीचे निवेदक बोलतात ती मराठी ‘प्रमाण’ असते.
अक्षरांशी आणि शब्दांशी खेळताना खूप मजा आली पाहिजे. मला येते. तुलाही ती यावी म्हणून हा सगळा खटाटोप केला आहे.’’
हसत-खेळत मराठी शिकवणाऱ्या अशा पुस्तकाची कमतरता होती. ती ‘लिहावे नेटके’ या अभिनव पुस्तकसंचाने भरून काढली आहे. म्हणून अशा उपक्रमांचे स्वागत करायला हवे.
लिहावे नेटके : लेखक - माधुरी पुरंदरे
प्रकाशक : ज्योत्सना प्रकाशन,
वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र, पुणे
किंमत : भाग-१, भाग-२, उत्तरपुस्तिका
एकत्रित रु. ४००

तीळगूळ!

खूप र्वष झाली, पण ती मकर संक्रांत अजून त्याच्या लक्षात आहे.
असलं काही आठवलं की मन खूप खूप मागे जातं. लहानग्या मुठीएवढं चिमुकलं होतं.
छोटय़ा बाळाची दुपटी बदलण्यात गुंग झालेल्या आईला त्याच्याकडे पाहायला वेळ नव्हता, ते दिवस होते ते. रोज सकाळी तो स्वत:चा स्वत: उठे. स्वत:च आरशासमोर उभं राही. दात घासे. एखादे दिवस नाही घासले दात तरी चालत होतं. त्याच्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं ना! आज्जी खूप साय पाडून चहाचा कप पुढे करायची. सकाळी उठून ‘बॉऽऽक’ व्हायचं. आपल्याला साय आवडत नाही, हे तिला पाचशेचोवीस वेळा सांगूनही ध्यानात यायचं नाही. तेव्हा आई अवघडलेल्या अवस्थेत बाळाला मांडीवर घेऊन बसल्याजागी डुलक्या मारत असायची.
‘‘तुझी तू काढून टाक बरं ती साय! दादा ना तू आता? मग नीट वागायचं,’’ कंटाळलेल्या आवाजात आई बसल्या जागेवरून समजूत काढायची. अस्सा राग यायचा. ‘काँईऽऽऽ असा आवाज करत बारीक आवाजात बाळ रडत असे. सकाळपासून सगळं घर त्या बाळाच्या मागे धावे. मग एक मावशी यायची. ती आली की दार बंद करून आई आणि बाळाला काही तरी करायची. त्या वेळी ‘आत यायचं नाही’ असं ती मावशी डोळे वटारून सांगायची. उद्या तिला पाणी पिण्याचं भांडं फेकून मारायचं असं रोज ठरवूनही तो रोज विसरायचा! अशा वेळी त्याला भारी एकटं एकटं वाटे. बाहेरच्या खोलीत येऊन तो ओठावर ओठ घट्ट दाबून रडं आवरे. डोळे डबडबून येत. घशात भारी दुखे. झोपाळय़ाची कडी धरून तो मुकाट बसून राही.
खोलीचं दार उघडलं की एक अनामिक धुरकट वास नाकात भरे. मस्त वाटे. सारं रडं विसरून तो खोलीत धाव घेई. हसऱ्या चेहऱ्यानं आई त्याला जवळ घेई. स्वच्छ दुपटय़ात बांधलेलं बाळ मुठी चोखत हुंकार देऊ बघे. ‘बघ, तुला बोलावतोय तो!’, आई सांगे. आई झोपायची त्या पलंगाच्या खाली घमेल्यात काही तरी विस्तवासारखं घमघमत असे. त्याचाच तो धुरकट वास असायचा. तो आईच्या पदराला येई आणि बाळाच्या दुपटय़ालाही. ‘‘आई, तू कधी बरी होणार?’’, दुखऱ्या आवाजात तो विचारायचा. आई गलबलून जायची. ‘‘अरे मी बरीच आहे राजा, मला काही नाही झालेलं’’, ती सांगायची आणि पटकन त्याचा पापा घ्यायची. असा पापा तिनं घेतला की त्याला खूप आधार वाटे. तेवढय़ात बाबा येत, ‘‘काय रे गधडय़ा, बाळाशी काही उद्योग करून ठेवशील, लेका! चल, बाहेर खेळ, इथं नको टिवल्याबावल्या करूस..’’
हिरमुसला होऊन तो पुन्हा बाहेर ढकलला जाई.
एकदा आज्जी पहाटे उठून तव्यावर काहीतरी करत होती. काय करतेस? विचारलं तर म्हणाली हलवा. कशाला? विचारलं तर म्हणाली, दागिने करायला. डोंबलंटोंबलं. मग हायहुस्स करत तिनं तीळगुळाचे लाडूही वळले. मोठी माणसं एवढे छोटे लाडू करतात हे बघून त्याला हसायलाच आलं. त्यापेक्षा तो काटेदार, पांढराशुभ्र हलवा त्याला आवडला. मोत्याच्या दाण्यासारखा शुभ्र. आकाशातल्या चांदणीसारखा. लांबून पाहिला तर चमकेलसुद्धा. आज्जीनं दोन दाणे त्याच्या हातावर ठेवले. ‘खा’, म्हणाली. कुडुमकुडुम आवाज करत त्यानं ते खाल्ले. तो बेहद्द खुश झाला.
दुसऱ्या दिवशी गडबड उडाली. हलव्याचे दागिने करून बाळाला घातले गेले. मुकुट. कंबरपट्टा. मनगटय़ा. वाळे. गळय़ातलं.. एक बासरीसुद्धा होती. सगळ्या बायांनी मिळून बाळाला खूप रडवलं. बाळाचं रडं थांबता थांबेना. आईनं प्रयत्न करून पाहिला. आज्जीनं त्याची दृष्ट काढून झाली. अचानक त्याला आयडिया सुचली. गुडघ्यावर बसत, ओणवा होत, खिशात हात घालून त्यानं एक हलव्याचा दाणा काढला आणि बाळाच्या ओठांवर धरला. त्याला जीभ लावताक्षणी बाळाचं रडं थांबलं.
‘गधडय़ा घशात जाईल ना त्याच्या!’’, असं म्हणत आईनं संतापून त्याच्या पाठीत धपाटा घातला आणि त्याला बाजूला ढकललं. बाहेर झोपाळय़ावर येऊन तो हमसाहमशी रडू लागला. तेवढय़ात बाबा आले, त्यांनी त्याला उचलून घेतलं, ‘‘बाळासाहेब, म्हणून म्हणतो आम्ही फार जवळ जाऊ नका म्हणून. आपली कामं नाहीत ती. चल, डोळे पूस. बाहेर जाऊ फिरायला.’’
खूप दिवसांनी मग तो बाबांचं बोट धरून फिरायला बाहेर पडला. एका खिशात शंभराच्या वर हलव्याचे दाणे होते आणि दुसऱ्या खिशात तीळगुळाचे बारा लाडू! त्यानंतर इतक्या मकर संक्रांती आल्या आणि गेल्या. पण गोडगोड कुडुमकुडुम हलव्याची आणि तीळगुळाच्या लाडवाची ती चव त्याला इतक्या वर्षांत एकदाही चाखायला नाहीच मिळाली.

Sunday, January 2, 2011

. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०११ साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


                                             
नूतन वर्षाभिनंदन ! 2011