Total Pageviews

Thursday, April 14, 2011

शिबीर!

लहानपणाची एक आठवण त्याच्या स्मरणात अजून आहे. कधी ती अंधूक आठवते. कधी ठळक स्पष्ट डोळय़ांना दिसते. हे गौडबंगाल त्याला काही कळत नाही. तेव्हा तो काही फार लहानगा नव्हता. असेल बारा नाही तर तेराचा.. दूर कुठल्यातरी प्रदेशात होणाऱ्या शिबिराला त्याला पाठवा, असं एक ओळखीचे काका सांगून सायकलवर टांग टाकून निघून गेले, आणि ते सगळं सुरू झालं..
‘‘इतक्या लांब कुठे पाठवणार? किती लहान आहे तो.. तुझं आपलं काहीतरीच!’’, बाबांनी आईला पहिल्यांदा उडवूनच लावलं, ‘‘ हे कॅम्प वगैरे भंकसबाजी असते सगळी.. पैसे काढायची लाइन! तुमची पोरं पाठवा, वर हजारो रुपये पण आमच्या बोडख्यावर ओता. हज्जारो रुपये घेऊन हे आमच्या पोरांना तंबूत झोपवणार, आणि बटाटय़ाची भाजी नि तेलकट पुऱ्या खायला घालणार! मरो तो कॅम्प आणि ट्रिप. इथेच घाल कुठल्या तरी क्रिकेट शिबिरात!’’
आई दुग्ध्यात पडली. पाठवावं की राहू दे यंदा? आजवर कधी आईला सोडून फारसा राहिलेला नाही. क्वचित कधी आज्जीआजोबांबरोबर दोनेक दिवस राहिला तर. पण बाकी हे पोर अंगाखांद्यावरच आहे अजून. पण असं किती दिवस राहणार? कॅम्पमध्ये गेला तर चारचौघांत राहून काही जगरहाटीचा अंदाज येईल. उघडय़ावरचे खेळ खेळून थोडा कणखर होईल. ती पंजाबी नि गुजराथ्यांची मुलं कशी चलाख असतात. कॅम्पला जातील. स्पर्धामध्ये उतरतील. क्रिकेट शिबीर. नाटय़शिबीर. गाणी. नाच.. नटतील. मुरडतील. सगळं करतील. आपलीच मुलं अशी मागे राहतात.
कॅम्पला त्याला पाठवायचंच. फायदा नाही झाला तर नाही झाला, नुकसान तर काहीच नाही, पैशाचं सोडलं तर.. असा कौल आईनं दिल्यावर अचानक बाबा कॅम्प चांगला असतो, धम्माल येते वगैरे बोलायला लागला! त्याला आश्चर्यच वाटलं. कॅम्प म्हणजे एक ट्रिप असते. ट्रेननं लांब जायचं आणि तिथे भरपूर चालायचं. खेळायचं. गाणीबिणी म्हणायची. मुख्य म्हणजे आपलं सगळं एकटय़ानं करायचं. आपली बॅग सांभाळायची. रोजचे कपडे त्यात स्वत: घडय़ा घालून ठेवायचे. पांघरूण लाथाडून तसंच उठायचं नाही. उठायची वेळ झाली की इमानदारीने उठायचं. स्वत:च्या टूथब्रशवर स्वत: टूथपेस्ट लावायची! भरपूर दूध घातलेल्या चहात बुडवायला क्रीम बिस्किटं नसली तरी ओरडायचं नसतं तिथे.
खूप चालायचं रोज. खेळ खेळायचे.. इट्स ओके. जायला काही हरकत नाही, असं त्याला वाटलं. बाबांनी पण मस्त वर्णनं करून कॅम्पमधल्या मजा मजा आधीच सांगून टाकल्या होत्या. आई मात्र गप्प होती.
रेल्वे स्टेशनात कॅप घातलेले एक काका हातात कागद घेऊन पेनानं काही खुणा करत उभे होते. बाबांनी त्यांना ‘हाय’ केलं. त्यांनीही ‘नमस्कार’ म्हणत याच्या डोक्यावर टप्पल मारली. ‘‘झाली का तयारी, चिरंजीव? जायचं ना?’’ त्यानं मान डोलावली. त्यावर ते काका म्हणाले, ‘‘ हो काय हो? तुझी बॅग आधी घे पाहू बाबांकडून! इथून पुन्हा परतेपर्यंत तुझी तूच सांभाळायचीस, चालेल?’’ त्यानं परत मान डोलावली. इतर मुलं आपल्या आई-बाबांबरोबर येत होती. काकांना भेटून घाईघाईनं पुढे डब्याकडे जात होती. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून बाबांनी त्या काकांना बऱ्यापैकी पिडल्यावर ते डब्याकडे आले. डब्याच्या दरवाजाचा तो उंच पिवळा दांडा धरून तो तीन पायऱ्या चढून आत गेला..
..हिरवळीच्या सुंदर उतारावरचे काही तंबू. दूरवर दिसणारे निळेनिळे डोंगर. थोडय़ाशा अंतरावर खालच्या बाजूला खळाळत वाहणारी चिमुकली नदी. काही झोपडय़ा. माळावर चरणारी गायीगुरं. तंबूतंबूतून येणारे खिदळण्याचे ओरडण्याचे आवाज. एका तंबूबाहेर पेटलेलं चुलाण आणि त्यावर बनणारा शिरा. त्याला वाटलं, आपण या घटकेला ग्रीटिंगकार्डातच राहतो आहोत! मस्त सीनसीनरीचं ग्रीटिंगकार्ड. जिथं कितीही भांडणं झाली तरी रुसायला होत नाही. कितीही चाललं, मस्ती केली तरी दमायला होत नाही. कितीही खाल्लं तरी पोट काही भरत नाही. एरवी ‘यकी’ लागणारा उपमा इथे किती टॉप लागतो. मित्रांबरोबर धमाल करत राहण्यातच खरी मजा आहे.. तो परत आला. आईबाबांना भेटला, तेव्हा त्याला त्यांना पाच हजार पाचशे बेचाळीस गोष्टी सांगायच्या होत्या. आणि हो, त्यानंतर त्यानं चहा पिणंही सोडलं आपोआप.
त्या कॅम्पमध्ये त्याची स्वत:चीच स्वत:शी चांगली मैत्री झाली.
आता तो दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचे कॅम्प्स नेतो. रेल्वे स्टेशनावर कॅप घालून हातात कागद घेऊन लहानग्यांना विचारतो, ‘‘झाली का तयारी, चिरंजीव? जायचं ना?’’

No comments: