Total Pageviews

Sunday, January 16, 2011

तीळगूळ!

खूप र्वष झाली, पण ती मकर संक्रांत अजून त्याच्या लक्षात आहे.
असलं काही आठवलं की मन खूप खूप मागे जातं. लहानग्या मुठीएवढं चिमुकलं होतं.
छोटय़ा बाळाची दुपटी बदलण्यात गुंग झालेल्या आईला त्याच्याकडे पाहायला वेळ नव्हता, ते दिवस होते ते. रोज सकाळी तो स्वत:चा स्वत: उठे. स्वत:च आरशासमोर उभं राही. दात घासे. एखादे दिवस नाही घासले दात तरी चालत होतं. त्याच्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं ना! आज्जी खूप साय पाडून चहाचा कप पुढे करायची. सकाळी उठून ‘बॉऽऽक’ व्हायचं. आपल्याला साय आवडत नाही, हे तिला पाचशेचोवीस वेळा सांगूनही ध्यानात यायचं नाही. तेव्हा आई अवघडलेल्या अवस्थेत बाळाला मांडीवर घेऊन बसल्याजागी डुलक्या मारत असायची.
‘‘तुझी तू काढून टाक बरं ती साय! दादा ना तू आता? मग नीट वागायचं,’’ कंटाळलेल्या आवाजात आई बसल्या जागेवरून समजूत काढायची. अस्सा राग यायचा. ‘काँईऽऽऽ असा आवाज करत बारीक आवाजात बाळ रडत असे. सकाळपासून सगळं घर त्या बाळाच्या मागे धावे. मग एक मावशी यायची. ती आली की दार बंद करून आई आणि बाळाला काही तरी करायची. त्या वेळी ‘आत यायचं नाही’ असं ती मावशी डोळे वटारून सांगायची. उद्या तिला पाणी पिण्याचं भांडं फेकून मारायचं असं रोज ठरवूनही तो रोज विसरायचा! अशा वेळी त्याला भारी एकटं एकटं वाटे. बाहेरच्या खोलीत येऊन तो ओठावर ओठ घट्ट दाबून रडं आवरे. डोळे डबडबून येत. घशात भारी दुखे. झोपाळय़ाची कडी धरून तो मुकाट बसून राही.
खोलीचं दार उघडलं की एक अनामिक धुरकट वास नाकात भरे. मस्त वाटे. सारं रडं विसरून तो खोलीत धाव घेई. हसऱ्या चेहऱ्यानं आई त्याला जवळ घेई. स्वच्छ दुपटय़ात बांधलेलं बाळ मुठी चोखत हुंकार देऊ बघे. ‘बघ, तुला बोलावतोय तो!’, आई सांगे. आई झोपायची त्या पलंगाच्या खाली घमेल्यात काही तरी विस्तवासारखं घमघमत असे. त्याचाच तो धुरकट वास असायचा. तो आईच्या पदराला येई आणि बाळाच्या दुपटय़ालाही. ‘‘आई, तू कधी बरी होणार?’’, दुखऱ्या आवाजात तो विचारायचा. आई गलबलून जायची. ‘‘अरे मी बरीच आहे राजा, मला काही नाही झालेलं’’, ती सांगायची आणि पटकन त्याचा पापा घ्यायची. असा पापा तिनं घेतला की त्याला खूप आधार वाटे. तेवढय़ात बाबा येत, ‘‘काय रे गधडय़ा, बाळाशी काही उद्योग करून ठेवशील, लेका! चल, बाहेर खेळ, इथं नको टिवल्याबावल्या करूस..’’
हिरमुसला होऊन तो पुन्हा बाहेर ढकलला जाई.
एकदा आज्जी पहाटे उठून तव्यावर काहीतरी करत होती. काय करतेस? विचारलं तर म्हणाली हलवा. कशाला? विचारलं तर म्हणाली, दागिने करायला. डोंबलंटोंबलं. मग हायहुस्स करत तिनं तीळगुळाचे लाडूही वळले. मोठी माणसं एवढे छोटे लाडू करतात हे बघून त्याला हसायलाच आलं. त्यापेक्षा तो काटेदार, पांढराशुभ्र हलवा त्याला आवडला. मोत्याच्या दाण्यासारखा शुभ्र. आकाशातल्या चांदणीसारखा. लांबून पाहिला तर चमकेलसुद्धा. आज्जीनं दोन दाणे त्याच्या हातावर ठेवले. ‘खा’, म्हणाली. कुडुमकुडुम आवाज करत त्यानं ते खाल्ले. तो बेहद्द खुश झाला.
दुसऱ्या दिवशी गडबड उडाली. हलव्याचे दागिने करून बाळाला घातले गेले. मुकुट. कंबरपट्टा. मनगटय़ा. वाळे. गळय़ातलं.. एक बासरीसुद्धा होती. सगळ्या बायांनी मिळून बाळाला खूप रडवलं. बाळाचं रडं थांबता थांबेना. आईनं प्रयत्न करून पाहिला. आज्जीनं त्याची दृष्ट काढून झाली. अचानक त्याला आयडिया सुचली. गुडघ्यावर बसत, ओणवा होत, खिशात हात घालून त्यानं एक हलव्याचा दाणा काढला आणि बाळाच्या ओठांवर धरला. त्याला जीभ लावताक्षणी बाळाचं रडं थांबलं.
‘गधडय़ा घशात जाईल ना त्याच्या!’’, असं म्हणत आईनं संतापून त्याच्या पाठीत धपाटा घातला आणि त्याला बाजूला ढकललं. बाहेर झोपाळय़ावर येऊन तो हमसाहमशी रडू लागला. तेवढय़ात बाबा आले, त्यांनी त्याला उचलून घेतलं, ‘‘बाळासाहेब, म्हणून म्हणतो आम्ही फार जवळ जाऊ नका म्हणून. आपली कामं नाहीत ती. चल, डोळे पूस. बाहेर जाऊ फिरायला.’’
खूप दिवसांनी मग तो बाबांचं बोट धरून फिरायला बाहेर पडला. एका खिशात शंभराच्या वर हलव्याचे दाणे होते आणि दुसऱ्या खिशात तीळगुळाचे बारा लाडू! त्यानंतर इतक्या मकर संक्रांती आल्या आणि गेल्या. पण गोडगोड कुडुमकुडुम हलव्याची आणि तीळगुळाच्या लाडवाची ती चव त्याला इतक्या वर्षांत एकदाही चाखायला नाहीच मिळाली.

No comments: