Total Pageviews

Monday, April 23, 2012

शाळेची आठवण,

मिलिंद बोकिल यांच्या कादंबरीवर आधारीत शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याची चर्चा ऐकूण मलाही तो चित्रपट पहावा असं वाटलं. त्यातच बोकिलांची शाळा कादंबरी   वाचून काढली आणि लगेचच शाळा चित्रपटही पाहिला.. मोठ्या पडद्यावरची मजा काही घेता आली नाही पण घरीच टीव्हीवर तो पाहिला..छान वाटला चित्रपट..! शाळा पाहताना सारखं लहानपणाची आठवण होत होती…त्या मुलांनी जो काही धिंगाणा घातलाय तो नैसर्गिक आहे. ज्यांनी ज्यांनी तो चित्रपट पाहिला त्या सर्वांना आपल्या शाळेची आठवण नक्कीच झाली असणार..कारण थोड्याफार फरकानं आपल्या सर्वांच्या शाळेतल्या आठवणी तशाच आहेत.चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यासमोरही आमची शाळा आली.. फरक एवढाच होता की या शाळेतली मुलं जो अतरंगीपणा करतात तो आम्हाला फारसा करायला मिळाला नाही. ..शाळेतला अभ्यास, मास्तरांचा मार, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती हा जो प्रकार त्यात दाखवलाय तो मात्र तंतोतंत मिळता जुळता आहे..शाळेत जे काही चार -पाच हुशार विद्यार्थी होते त्यात माझी गणना होत होती…मराठीचे आमचे मास्तर तर छड्या मारण्यात पटाईतच. माझ्या वर्गातल्या झाडून सगळ्यांनी त्यांचा मार खाल्लाय. मला मात्र कोणत्याच शिक्षकाचा मार खावा लागला नाही..हे आमचे मराठीचे मास्तर धड्यावरचे प्रश्न पाठ करुन या असं फर्मान सोडायचे. त्यांचं फर्मान म्हणजे दुस-या दिवशी मार खाण्याची तयारी ठेवूनच यायचं..माझा त्यात नंबर लागत नव्हता..कारण मी अभ्यास करुन यायचो..दुस-या दिवशी ते प्रश्न विचारताच ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्यांना उभं राहण्यास सांगायचे आणि सर्व वर्ग उभा रहायचा. पुढच्या बाकावरचे आम्ही पाच सहा जणच खाली बसलेलो असायचो..मग काय उत्तर ज्यांना येत नाही त्यांना छड्यांचा मार पडायचा..हे नेहमीच चालायचं..नंतर नंतर मास्तर छड्या मारण्याचं सोडून द्यायचे..पण त्या बदल्यात जो बरोबर उत्तर देईलं त्याला उत्तर न येणा-यांच्या गालावर जोरात चापटा मारण्यास सांगायचे..अर्थात त्यातही माझा नंबर लागायचा..सहकारी विद्यार्थांना जाम मारायला मिळायचं..
 शाळा चित्रपटात त्या मुलांनी जो आगाऊपणा केलाय तसा किंवा त्याच्याशी थोडासा मिळतातुळता प्रकार आम्ही अकरावी- बारावीला  गेल्यानंतर केला.कॉलेजमध्ये काही विषय हे फक्त स्कोअरिंगसाठी घेतलेले असायचे. त्या क्लासला तर मागच्या बाकावर बसून गप्पा मारणं..मुलांकडे बघत बसणे हाच उद्योग चालायचा.. असे अनेक किस्से आहेत..पण ते सर्व या ठिकाणी लिहिणं शक्य नाही..असेच नसते उद्योग तुमच्या माझ्या अनेकांनी शाळा कॉलेजात केलेले आहेत…आता आपण ते कधी कधी आठवतो तेंव्हा हसायलाच येतं. त्यावेगळच्या आपल्या सहकारी मुली आठवल्या की आता त्या कशा असतील म्हणजे कशा दिसत असतील असं चित्रही लगेच डोळ्यासमोरून जातं..शाळा पाहिल्यानंतर त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. त्यामुळे मिलिंद बोकिल यांना धन्यवाद आणि चित्रपटाच्या टीमलाही धन्यवाद..

No comments: