Total Pageviews

Friday, November 5, 2010

देही’ असो द्यावे समाधान......

योगशस्त्राचा अनुभव प्रत्येकाने घेण्यासारखा आहे कारण या शास्त्राचा दिनचर्येशि व शारिरस्थितीशी अति निकट संबंध आहे. यम व नियम हे अष्टांग योगाच्या खालच्या पायर्‍या आहेत.योग-समाधि रुपी पर्वतमाथ्यावर जाण्यासाठी त्यांचे अनुष्ठान करणे आवश्यक असते. सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे पांच यम आहेत. शौच, संतोष,तप,स्वाध्याय आणि इश्वरप्रणिधान हे नियम आहेत. या शब्दांची लक्षणे समजून घेतली पाहिजेत. यम स्वतःकरता तर नियम समाजाकरता आहेत. या योगांगांचे अनुष्ठान केले असता चित्तातील व शरिरातील अशुद्धी क्षय होतो, ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते.ज्ञानदीप्ती मुळे विवेकख्याती प्राप्त होते. अष्टांगयोगशास्त्रात " संतोषादनुत्तमः सुख लाभः। "असे एक सूत्र आहे. इश्वराने आपणास जी अनुकूल साधने दिलेली आहेत त्यातच समाधान मानून अधिकाची इच्छा न करता मिळालेल्या साधनांचा अधिकांत अधिक उपयोग करुन घेणे ही संतोषवृत्ती होय. प्राप्त परिस्थितीत आनंद मानणे हा संतोष होय.अशी वृत्ती सतत राहूं लागली की अंतःकरणातील विषय ओढा कमी होतो.चित्तात आत्मसुखामुळे सहजानंद प्राप्त होतो. तो आनंद बाह्य उपाधिवर अवलंबून नसल्यामुळे अनुत्तम असतो.या सुखापुढे सर्व ऐहिक किवा स्वर्गिय दिव्य सुखं अगदी क्षुद्र वाटतात. शारिरीक आरोग्य प्राप्त होते. असा हा अरोग्याचा व मनाला शीतल शान्ति देणारा भारतीय अमृतकुंभ दुर्लक्षित करुन परदेशी डबक्यातील पाणी टमरेलने पिण्यात काही लोक स्वतःला धन्य मानतात. शरिरातील मेरुदंडाचे आरोग्य टिकण्यासाठी दररोज सकाळी पाय पसरून काल्पनिक जात्याचा खुंट्टा ५० वेळा घड्याळाच्या दिशेने व विरुद्ध दिशेने फिरवावा.एका महिन्यात मेरुदंडाचे विकार नष्ट होतात.

No comments: