पांघरुणातल्या पांघरुणात तो उदास होत गेला आणि त्या औदासीन्यानं त्याला झोपेतून बळेच ओढून काढलं. तेवढय़ात आई आलीच उठवायला.
‘‘उठतोयस नं रे.. शाळेत जायचंय आज!’’ आईनं घेतलेली पापी आज खूप गोड वाटली नाही. खांदा हिसडून तो अंथरुणात अधिकच मुरला. आई आणखी एक-दोन पाप्या घेऊन दोन-चार मिनिटं झोपू देईल. मग मात्र..
दात घासायला ब्रशवर टूथपेस्ट देऊन आई स्वैपाकघरात गेली. दात घासणं थांबवून तो आरशात खुळ्यासारखा पाहात राहिला. एक किडमिडीत बुटका मुलगा त्याच्याकडे झोपाळू नजरेनं बघत होता.
येडा आहेस येडा! बघतो काय असा डुक्करसारखा? शाळेत जा गुपचूप..!! मनातल्या मनात तो ओरडला. तोंडं वेडीवाकडी करून पाहिली. टूथपेस्टचा भरपूर फेस येऊनही आज दात घासताना मजाच नाही आली! डोळ्यातली चिपाडं काढण्याचा प्रयत्न मग त्यानं केलाच नाही. तेवढय़ात घाईनं आलेल्या आईनं भराभरा त्याचा चेहरा स्वच्छ धुतला. नाक शिंकरून घेतलं. भराभरा त्याचे कपडे काढून टाकत ऊन ऊन पाणी त्याच्या अंगावर ओतलं. साबणाचा सुगंध त्याला एरवी जाम आवडतो. आज नेमका तो डोळ्यात गेला. हातातल्या प्लास्टिकच्या मगाने त्यानं आईलाच मारायचा क्षीण प्रयत्न केला. डोळ्यात झोंबत होतं, आणि मनात प्रच्चंड चीड आली होती. न्हाणीघराच्या दरवाजात अध्र्या चड्डीत शिट्टय़ा मारत हसत उभ्या असलेल्या बाबाला बघून तर त्याचं डोकंच सटकलं. या दोघांनाही बेडूक केलं पायजे!
टॉवेलात गुंडाळून खसाखसा पुसत त्याला पुन्हा आरशासमोर आणण्यात आलं. इस्त्री केलेला नवाकोरा युनिफॉर्म अंगावर चढवताना खरं तर त्याला छान वाटलं होतं, पण रागामुळे तसं काही त्यानं दाखवलं नाही. ‘‘पहिलाच दिवस आहे आज.. लौकर सोडतील!’’ त्याचा भांग पाडत आईनं समजूत काढली, ‘‘बाबा थांबेल बाहेर तोवर. काळजी करू नकोस. पण झालीच दिवसभर शाळा तर रडत बसायचं नाही. डब्यात छान खाऊ देतेय तुला. कळलं का शंभ्या!’’
आई असं बोलायला लागली की का कुणास ठाऊक, ओठ बाहेर बाहेर येतो. श्वास जोरात येऊन हुंदकाच येतो. खरं तर रडू येत नसतं. पण मग असं का होतं? गटागटा दूध पिऊन तो निघणार होता. पण त्याला दूध अजिबात आवडलं नाही. मळमळत होतं, रडवेल्या सुरात त्यानं आईला विचारलं, ‘‘आई मला शाळेत ओकी होईल?’’
‘‘छे रे, ओकी कशानी होईल? पावसाळी हवा आहे नं. म्हणून वाटतंय तुला असं!’’, आईनं पुन्हा समजूत घातली.
दफ्तर पाठीला अडकवून तो निघाला तेव्हा पाऊस नुकताच पडून गेला होता. रस्ते ओले होते. मोटारींचे हॉर्न नेहमीपेक्षा मोठय़ांदा वाजत होते. बाबाचा रेनकोट घट्ट पकडून तो बाईकवर बसला.
शाळेसमोर खूप छत्र्या आणि खूप रेनकोट होते. रंगीबेरंगी गर्दी. खूपच गोंगाट होता. शाळेचा शिपाई एकेका मुलाला गेटमधून आत सोडत होता. बाबाचं बोट धरून तो बावळटासारखा बघत राहिला.
‘‘काय साहेब, जायचं का वर्गात?’’ त्याच्या डोक्यावर नाजूकशी टप्पल बसली, म्हणून त्यानं मान मागे टाकत वर पाहिलं. सुंदर हसत बाई त्याच्याकडे होत्या. बाबाशी ओळखी ओळखीचं बोलत त्या म्हणाल्या, ‘‘डोण्ट वरी. आम्ही खूप मज्जा करणार आहोत शाळेत. हो की नाही रे!’’
मान डोलवावी, की न डोलवावी, या संभ्रमात असतानाच बाईंच बोट पकडून तो आत कधी गेला ते त्यालाही कळलं नाही. गेला तो चक्क रमलाच!
