Total Pageviews

Tuesday, October 29, 2013

पाणीमहाल





अज दीदन ई चश्म मुहिब्बान रोशन


मीगर्दद व चश्म दुश्मनान गर्दद कूर


(या पाणीमहालाकडे एखाद्या मित्राची नजर गेल्यास त्याचे डोळे प्रसन्नतेने उजळतील, तर शत्रूच्या डोळय़ांपुढे अंधारी येईल!)


सोलापूरहून हैदराबादकडे निघालो, की वाटेत नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) नावाचे पहिलेच मोठे गाव लागते. खरेतर हे गाव येण्यापूर्वी या गावाशेजारचा किल्लाच लक्ष वेधून घेतो. या नळदुर्ग किल्ल्यात असलेल्या पाणीमहाल नामक एका गूढ-अद्भुत वास्तूवरील हा फारसी लिपीतील शिलालेख व त्याचा हा अर्थ!


मराठवाडय़ात जोरदार पावसाच्या बातम्या आल्या, की हा नळदुर्ग एकदम चर्चेत येतो. एरव्ही कोरडी ठणठणीत असणारी इथली बोरी नदी दुथडी भरून वाहू लागते. हे पाणी किल्ल्यातून वाहणाऱ्या नदीवरील पाणीमहालाला येऊन धडकते. बांध भरतो आणि त्याच्या नर-मादी सांडव्यावरून तो वाहू लागतो. धावते पाणी आणि त्याला आवर घालणारी एक चिरेबंदी वास्तू यांच्या भेटीतून सौंदर्याचा आविष्कार जन्म घेतो. ज्यामुळे हा पाणीमहालच नाही तर सारा नळदुर्गच खुलून जातो. यंदा तब्बल सहा वर्षांनंतर हा आविष्कार पुन्हा अवतरल्याने अनेकांची पावले नळदुर्गकडे धावली आहेत.


हा किल्ला व्यवस्थित पाहायचा असेल तर सोलापूर किंवा तुळजापूरला मुक्काम करत भल्या सकाळीच नळदुर्गच्या दारात हजर व्हावे. नळदुर्ग गावात आल्यासरशीच ही अवाढव्य वास्तू समोर उभी राहते. १२६ एकर क्षेत्रफळ आणि त्याला तब्बल ११४ बुरुजांची दुहेरी तटबंदी, ही आकडेवारीच या किल्ल्याची भव्यता स्पष्ट करते.


नळदुर्ग ही चालुक्यांची निर्मिती! पण स्थानिक लोक त्याचा इतिहास अगदी पुराणातील राजा नल आणि दमयंतीपर्यंत नेऊन भिडवतात. चालुक्यांनंतर इथे बहमनी राजवट आली. या बहमनी राजवटीचे तुकडे झाल्यावर पुढे तो विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. या राजवटीतच सुलतान अबुल मुजफ्फर अली आदिलशाह पहिला याने इसवी सन १५६० मध्ये गडाला आजचे हे आक्रमक रूप दिले. अशारीतीने चालुक्य, बहमनी, आदिलशाही, मुघल आणि सरतेशेवटी हैदराबादचा निजाम असा भलामोठा प्रवास करत हा नळदुर्ग आज एक राष्ट्रीय स्मारक बनला आहे.


तब्बल हजारएक वर्षे जुनी ही काळाची पावले शोधतच आपण नळदुर्ग फिरू लागतो. गड विस्ताराने भलामोठा आणि त्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंचीही तेवढीच गर्दी. हत्तीखाना, मुन्सिफ कोर्ट, जामे मशीद, धान्य - दारूगोळय़ांची कोठारे, ब्रिटिशांची स्मारके, मछली बांध, नऊ पाकळय़ांचा नवबुरूज, रंगमहाल, बारादरी, राजवाडा, राणीमहाल, उफळय़ा ऊर्फ टेहळणीचा बुरूज असे गडावर बरेच पाहण्यासारखे आहे. पण या साऱ्यांत पाणीमहाल नळदुर्गच्या हृदयस्थानी!


वास्तूंच्या या गोतावळय़ातच राजवाडय़ाच्या दिंडीदरवाजातून त्या पाणीमहालाचे प्रथम, भिजरे दर्शन घडते आणि मग आपले मनही चिंब होते.


गडाच्या मध्यातून वाहणारा नदीचा तो फाटा. पाण्याने भरलेला! भूगोलातील या आश्चर्याला इतिहासातील तटबुरुजांच्या बाजूबंदांनी सजवलेले ..आणि या साऱ्या देखाव्यात नदीपात्रात मधोमध पाय रोवून उभा ठाकलेला तो पाणीमहाल! सशक्त शरीराचा आणि नाजूक सज्जे, कमानी-गवाक्षांचा! या गवाक्षांच्याच पुढून ते नर-मादी धबधबे कोसळत असतात. हिरवाईच्या कोंदणात, पाण्याचे सान्निध्य घेत!


हा सारा एका नदीवरचा-तिच्या पाण्यावरचा खेळ! तो सुरू आहे, एका चिरेबंदी तरल वास्तूशी! नळदुर्गच्या उत्तरेकडून बोरी नावाची एक नदी वाहात येते. ती उत्तर आणि पूर्व बाजूने गडाला वेढा घालत दक्षिणेकडे निघून जाते. ..हा इथला मूळचा भूगोल! पण या भूगोलालाच मग कधीकाळी एका पराक्रमी इतिहासाची जोड मिळाली. नळदुर्गच्या निर्मात्याने या नदीच्या आरंभीच तिला तिच्या आकाराचे आणखी दोन फाटे दिले-तयार केले. एक फिरवला गडाच्या पश्चिमेकडून दक्षिण दिशेला, तर दुसरा गडाच्या मध्यभागातून पुन्हा मूळ नदीकडे वळवला. मूळ नदी आणि तिच्या नव्याने फिरवलेल्या या फाटय़ांमुळे या भुईकोटाचा एक जलदुर्गच बनला. दुर्गाभोवती फिरलेल्या नदीच्या या पाण्याने या दुहेरी तटाच्या किल्ल्याभोवती जणू पाण्याचा आणखी एक तट उभा राहिला. तर गडाच्या मधून फिरलेल्या पात्रातून पाण्याची सोय भागवली गेली.


नळदुर्गच्या या नदीजोड प्रकल्पास दुसरा इब्राहिम आदिलशाह याने इसवी सन १६१३ मध्ये, म्हणजे बरोबर चारशे वर्षांपूर्वी आणखी एक प्रकरण जोडले. जोडले कसले, ऐन नदीपात्रात उभे केले. गडाच्या मधोमध वाहणाऱ्या या नदीप्रवाहावर त्याने एक भलामोठा बांध घातला. ज्यायोगे नदीपात्रामुळे विभक्त झालेला किल्ला तर पुन्हा जोडला गेलाच, पण त्यापेक्षाही या बांधाच्या पोटात एक महाल तयार करत या स्थापत्याला सौंदर्याचीही जोड दिली. स्थापत्य आणि पाण्याच्या सुंदर मिलाफातून तयार झालेला हाच तो पाणीमहाल!


नदीपात्रात उभी असलेली ही गूढ चिरेबंदी वास्तू एरवीदेखील येणाऱ्या प्रत्येकाला खुणावते, पण त्यातही पावसाळा सुरू झाला, की या महालाचे सूर बदलतात.


पाऊस सुरू होतो. गडाच्या दिशेने येणाऱ्या बोरीतून तो वाहू लागतो. पात्र फुगत जाते आणि हळूहळू बांध भरू लागतो. मग एके दिवशी अचानक हे पाणी या महालावर प्रेम करत त्याच्या अंगाखांद्यावरून वाहू लागते.


पाण्याचा हा भलामोठा पसारा महालावरील नर-मादी या दोन सांडव्यावरून विलक्षण वेगाने फुसांडत बाहेर पडतो. कुणी म्हणते नळदुर्गचे धबधबे वाहू लागले, कुणी पाणीमहाल जिवंत झाल्याची उपमा देते, कुणी नर-मादी जागे झाल्याचे बोलते, तर कुणी आणखी काही! त्या दोन धारा जिवंत होतात आणि जणू या चिरेबंदी वास्तूच्या अंगावरूनच चैतन्याचे झरे वाहू लागतात. केवळ पाण्याच्या त्या एका स्पर्शाने इतके दिवस शांत, मूक असलेल्या वास्तूचे सारे सौंदर्य उमलून येते.


खरेतर ही वास्तूही या पाण्याची-पावसाची दरवर्षी अतिशय आतुरतेने वाट पाहात असते. पण मराठवाडय़ाशी कायम अंतर ठेवणारा हा पाऊस या नळदुर्गपासूनही चार हात दूर राहतो. वर्षांमागे वर्ष जातात, ऋतू-नक्षत्रांची अनेक आवर्तने सरतात, पण बोरी कोरडीच राहते आणि मग पाणीमहालही असाच अश्रू आटलेला उरतो.


पण, मध्येच कधीतरी एखाद्या वर्षी तो बरसू लागतो. पाऊस पडतो. बोरी दुथडी भरून वाहू लागते. मग गेल्या अनेक वर्षांचे हे आर्त दूर लोटत ही वास्तू पुन्हा मोहरते.. यंदाची ही तृप्तता अशीच काहीशी!


काय आणि कशी आहे, ही गूढरम्य वास्तू! १७४ मीटर लांब, अडीच ते १४ मीटर रुंद आणि तब्बल पाचमजली इमारतीएवढी म्हणजे १९ मीटर उंच! या बांधावरूनच चार मार्ग महालाच्या पोटात उतरतात. पहिला साधारण दोन मजले खाली उतरतो. इथे एक अष्टकोनी हौद, ज्यात कधीकाळी पाणचक्की चालत होती. पाण्याच्या शक्तीचा हा आणखी एक पैलू! साठलेले पाणी गतीने बाहेर पडत असतानाच त्यावर धान्याची चक्की चालविण्याची ही योजना. वेगवेगळय़ा मोऱ्यांमधून वेगाने येणारे हे पाणी इतिहासात इथे या चक्कीला फिरवायचे आणि त्यावर साऱ्या सैन्यासाठीचे धान्य दळून निघायचे. वरवर वाटणाऱ्या सौंदर्याला आता विचार-हुशारीची किनारही जाणवू लागते.


दुसरा भुयारी मार्ग पाणीमहालाच्या छतावर उतरतो, तर चौथा एकाखाली एक तीन मजल्यांवरून गणेशाचे दर्शन घडवतो. अन्य ठिकाणच्या कुठल्या तरी मंदिराची गणेशपट्टी इथे या दालनात दर्शनी भागात बसवलेली आहे. या गणेशाच्याच वास्तव्याने मग या महालालाच त्याचे नाव पडले. ही वास्तू इस्लामी कलेतील, पण त्यातही हे 'मांगल्य' कसे सामावलेले!


या साऱ्यातील तिसरी भुयारी वाट महत्त्वाची. ही त्या पाणीमहालाकडे निघते. अरुंद जिना त्या बांधकामाच्या आत शिरतो. ही वाट त्या बांधाच्या अगदी तळापर्यंत उतरते. या वाटेच्या मध्यावर तो पाणीमहाल दडला आहे.


पायऱ्या उतरू लागतो तसे अंधार आणि गूढ भीतीचे सावट चेहऱ्यावर दाटू लागते. समोरून अचानक वर उसळणारी वटवाघळे या भीतीत भर घालत असतात. मनातली ही भीती-ताण आणि पाठीमागचा विशाल जलाशय याचे दडपण झेलत आपण त्या वाटेच्या मध्यावर येतो आणि एकदम प्रकाशाची चाहूल लागते. हायसे वाटते. अंधारात बुडाल्याशिवाय प्रकाशाचे हे द्रष्टेपण समजत नाही, असेच काहीसे. प्रकाशाचे हे बोट पकडत डावीकडे वळत, चारदोन पावले टाकली, की एका सुंदर दालनात आपले पाऊल पडते. हाच तो एवढा वेळ प्रतीक्षा पाहणारा पाणीमहाल!


पश्चिम-उत्तरेकडे तोंड केलेली आयताकृती अशी ही दोन दालने, तर त्याला लागूनच बाहेर डोकावणारा नऊ गवाक्षांचा एक रेखीव सज्जा! यातील मुख्य दालनाच्या मधोमध कारंजे. या दालनाला लागूनच डावीकडे एक विशेष खोली अगदी स्नानगृह आणि शौचकूपासह! साऱ्या वास्तूत महिरपी भिंती, कलात्मक कमानी. छत-भिंती-कमानींवर सर्वत्र चुन्याच्या गिलाव्यात केलेले बारीक नक्षीकाम, छताच्या मधोमध झुंबर-हंडय़ांसाठीच्या कडय़ा, वेलबुट्टीत सजलेले सज्जाचे नऊ गवाक्ष! आजही सारे कसे नीटस, अलगद! अगदी काल-परवापर्यंत वापरात असल्याप्रमाणे!


हे सारे पाहता-पाहता भारावून जायला होते. या अवस्थेतून बाहेर सज्ज्यात यावे तो आपले जणू अस्तित्वच हरवायला होते. काय म्हणावे या दृश्याला, कसे प्यावे या सौंदर्याला. त्या रेखीव गवाक्षांच्या कमानींचे कोंदण घेत वरून कोसळणाऱ्या पाण्याचे पडदे अखंड वाहात असतात. मागे सारा हिरवाईचा काठ आणि त्यावरचे हे शुभ्र ईश्वरी देणे..जणू सारे जीवनच भारून जाते!


पावसाळा नसेल त्या वेळी या गवाक्षातून संध्याकाळच्या त्या पश्चिमा रंगतात. रात्रीचे आकाश चमचमते आणि पौर्णिमेचा चंद्रही आत डोकावतो.


..कसे असेल ते दृश्य! बाहेर सज्ज्यातून कोसळणारे पाण्याचे पदर, त्यातून आत शिरणारा मंद, गार वारा, कधी आत उतरणारे ते मावळतीचे गहिरे रंग तर कधी रात्रीचे चांदणे! कोनाडय़ातील दिवे, हंडय़ांतून पाझरणारा तो मंद प्रकाश, महालाच्या मधोमध नाचणारे ते कारंजे, त्याभोवतीने नृत्य करणारी ती ललना आणि शेजारच्या दालनातून आळवले जाणारे सूर-संगीत..हे सारे सौंदर्याचे राग, रंग, छटा अनुभवताना त्या वास्तूच्या, त्या वास्तुपुरुषाच्या मनात नेमके कुठले भाव उमटत असतील. सगळे अनाकलनीय, स्वर्गीय!


या अज्ञात स्थपतीचा मनोमन हेवा वाटतो, त्याच्या रसिकतेचे कौतुक वाटते आणि सौंदर्यदृष्टीची भुरळ पडते. या अनाघ्रात सौंदर्याला किती काळ पाहावे आणि किती साठवावे, असे होते.


असे वाटते, कधीकाळच्या या विलासी रंगात आज एकदम हे समाधीचे भाव कुठून आले?













Wednesday, February 27, 2013

सर्वाना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो .या दिवशी पासून आपण एक संकल्प करू कि मराठी भाषा आणि मराठी माणूस हा जगात आपली कीर्ती गाजवेल आणि या साठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू. ....आपली मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.!!!

Friday, November 2, 2012

सर्व वाचकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

सर्व वाचकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

Thursday, June 28, 2012

vc
 या नभाने या भुईला दान द्यावे 
आणि या मातीतुनी चैतन्य गावे 
कोणती पुण्ये अशी येती फळाला,
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे 

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे 
पाहता मृद्गंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे,
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोश होता
शब्दगंधे, तू मला बाहूत घ्यावे
 

                ना. धों. महानोर

Monday, April 23, 2012

शाळेची आठवण,

मिलिंद बोकिल यांच्या कादंबरीवर आधारीत शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याची चर्चा ऐकूण मलाही तो चित्रपट पहावा असं वाटलं. त्यातच बोकिलांची शाळा कादंबरी   वाचून काढली आणि लगेचच शाळा चित्रपटही पाहिला.. मोठ्या पडद्यावरची मजा काही घेता आली नाही पण घरीच टीव्हीवर तो पाहिला..छान वाटला चित्रपट..! शाळा पाहताना सारखं लहानपणाची आठवण होत होती…त्या मुलांनी जो काही धिंगाणा घातलाय तो नैसर्गिक आहे. ज्यांनी ज्यांनी तो चित्रपट पाहिला त्या सर्वांना आपल्या शाळेची आठवण नक्कीच झाली असणार..कारण थोड्याफार फरकानं आपल्या सर्वांच्या शाळेतल्या आठवणी तशाच आहेत.चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यासमोरही आमची शाळा आली.. फरक एवढाच होता की या शाळेतली मुलं जो अतरंगीपणा करतात तो आम्हाला फारसा करायला मिळाला नाही. ..शाळेतला अभ्यास, मास्तरांचा मार, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती हा जो प्रकार त्यात दाखवलाय तो मात्र तंतोतंत मिळता जुळता आहे..शाळेत जे काही चार -पाच हुशार विद्यार्थी होते त्यात माझी गणना होत होती…मराठीचे आमचे मास्तर तर छड्या मारण्यात पटाईतच. माझ्या वर्गातल्या झाडून सगळ्यांनी त्यांचा मार खाल्लाय. मला मात्र कोणत्याच शिक्षकाचा मार खावा लागला नाही..हे आमचे मराठीचे मास्तर धड्यावरचे प्रश्न पाठ करुन या असं फर्मान सोडायचे. त्यांचं फर्मान म्हणजे दुस-या दिवशी मार खाण्याची तयारी ठेवूनच यायचं..माझा त्यात नंबर लागत नव्हता..कारण मी अभ्यास करुन यायचो..दुस-या दिवशी ते प्रश्न विचारताच ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्यांना उभं राहण्यास सांगायचे आणि सर्व वर्ग उभा रहायचा. पुढच्या बाकावरचे आम्ही पाच सहा जणच खाली बसलेलो असायचो..मग काय उत्तर ज्यांना येत नाही त्यांना छड्यांचा मार पडायचा..हे नेहमीच चालायचं..नंतर नंतर मास्तर छड्या मारण्याचं सोडून द्यायचे..पण त्या बदल्यात जो बरोबर उत्तर देईलं त्याला उत्तर न येणा-यांच्या गालावर जोरात चापटा मारण्यास सांगायचे..अर्थात त्यातही माझा नंबर लागायचा..सहकारी विद्यार्थांना जाम मारायला मिळायचं..
 शाळा चित्रपटात त्या मुलांनी जो आगाऊपणा केलाय तसा किंवा त्याच्याशी थोडासा मिळतातुळता प्रकार आम्ही अकरावी- बारावीला  गेल्यानंतर केला.कॉलेजमध्ये काही विषय हे फक्त स्कोअरिंगसाठी घेतलेले असायचे. त्या क्लासला तर मागच्या बाकावर बसून गप्पा मारणं..मुलांकडे बघत बसणे हाच उद्योग चालायचा.. असे अनेक किस्से आहेत..पण ते सर्व या ठिकाणी लिहिणं शक्य नाही..असेच नसते उद्योग तुमच्या माझ्या अनेकांनी शाळा कॉलेजात केलेले आहेत…आता आपण ते कधी कधी आठवतो तेंव्हा हसायलाच येतं. त्यावेगळच्या आपल्या सहकारी मुली आठवल्या की आता त्या कशा असतील म्हणजे कशा दिसत असतील असं चित्रही लगेच डोळ्यासमोरून जातं..शाळा पाहिल्यानंतर त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. त्यामुळे मिलिंद बोकिल यांना धन्यवाद आणि चित्रपटाच्या टीमलाही धन्यवाद..

शाळा.........


.....त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.........

Wednesday, February 8, 2012

पराक्रमी इतिहासाचा मार्मिक मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न

बाजी प्रभू देशपांडे हे नाव महाराष्ट्रेतिहासात सुवर्णाक्षरात कोरलेले आहे. अफजल वधाच्या पश्चात शिवाजी राजांनी वाऱ्याच्या वेगाने केलेली विजयी दौड, अजिंक्यतारा पासून चंदन-वंदन-गुणवंत-सदाशिव-वसंतगड असे अनेक किल्ले घेत थेट पन्हाळगडाचा घेतलेला घास, बंडखोर सिद्दी जौहरने पन्हाळगडाला दिलेला वेढा, राजापुरकर इंग्रज अधिकारी हेन्री रेव्हिंगटन ह्याने केलेल्या नसत्या उचापती, ह्यावर वरचढ म्हणजे सिद्द्याचे व्यूह फोडून महाराजांनी करून घेतलेली सुटका आणि ह्या दरम्यान बाजी प्रभूंनी दिलेली प्राणाहुती ह्यामुळे इतिहासात एकंदरच पन्हाळगडच्या प्रसंगाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे.
शिवाजी राजे हिरडस मावळच्या बांदल देशमुखांचा ६०० पायदळासह पन्हाळगडाहून विशाळगडाकडे गेले असे कवींद्र परमानंद म्हणतात.
आता प्रश्न आहे की बांदल देशमुखच का ?
प्रतापगड युद्धानंतर सर्व जमाव घेऊन शिवाजी राजांनी रुस्तम-ए-जमान आणि फाजलखानाचा पराभव केला व त्यानंतर रुस्तम-ए-जमानची जहागीर होती त्यावर अधिकृतरीत्या [हा शब्दप्रयोग कारण आतून रुस्तम-ए-जमान आणि शिवाजी राजे यांची मैत्री होती हे सिद्धच आहे] महाराजांची सत्ता आली आणि तो प्रदेश होता राजापूर परगणा आणि याच दरम्यान विशालगड हा स्वराज्यात दाखल झालेला होता आणि विशालगडाच्या रक्षणाकरिता महाराजांनी जी मंडळी तैनात केली [प.सा.स.ले.८२६] त्यात हिरडस मावळातील बांदल मंडळी होती कारण प्रतापगडच्या युद्धात जर मुख्य सैन्य कुठले लढले असेल तर १२ मावळातील कान्होजी जेध्यांच्या पुढाकाराने जमलेले सैन्य ज्याचे मुख्य अंग होते जेधे आणि बांदल.तेव्हा बांदल देशमुखांचा जमाव हा विशाल गडावरच होता आणि शिवाजीराजांना नेण्याकरिता यातील काही माणसे विशालगडहून पन्हाळगडाकडे आली होती आणि सिद्दी जौहरचा वेढा चुकवत ती ज्या रस्त्याने आली तो रस्ता त्यांनी योग्य रीतीने हेरून ठेवला होता. बाजीप्रभू देशपांडे हा बांदलांचा सरनोबत होता. बांदल घराण्याचा प्रमुख असणारा रायाजी बांदल हा नेणता असल्यामुळे महाराजांना विशालगडावर पोचवण्याची जबाबदारी होती ती बाजी प्रभूंवर.
आषाढ वद्य प्रतिपदा उजाडली.हिरडस मावळच्या बांदल देशमुखांचा ६०० लोकांचा जमाव शिवाजीराजांबरोबर होता.राजे स्वतः पालखीत बसले होते.रात्री नउचा सुमार होता (रात्रीचा पहिला प्रहर).जौहरचा वेढा गाफील होता. भवानी देवीने शत्रुसैन्यावर मोहिनी घातली होती. महराजांनी प्रवास सुरु करताच, हेरांनी पूर्वी पाहून ठेवलेल्या मार्गावरील उंचसखल भूमी, विजांनीही तत्क्षणी दाखवली. खळखळत्या ओढ्यांच्या साक्षीने, जांघडभर चिखलातून, वृक्ष लतांच्या मधून, जिथे पावसाने त्रस्त झालेले वाघ गुहेत दाटी करून बसले आहेत आणि वारुळातून निघणाऱ्या सापांवर मोर चीत्कार करीत धावून जात आहेत अश्या पुर्व-हेरीत मार्गावरून शिवाजी राजे आक्रमून गेले.प्रेक्षणीय सभागृहे आणि पागा असलेल्या आपल्या विशालगडावर चढून तेथे आपल्या सैन्यास विश्रांती मिळावी ह्या हेतूने मुक्काम केला.
वरील परिच्छेद हा शिवभारतातील अनुवाद आहे आणि शिवभारत हा अव्वल दर्जाचा पुरावा मानला जातो.चरित्र नायकाला समोर ठेवून परमानंदानी श्री भवानी देवीने मोहिनी घातली वगैरे लिहिले आहे परंतु त्याची उकल होते ती अशी की शिवाजी राजांनी आदल्या दिवशीच वकील पाठवून सिद्दी जौहारास कळवले की आम्ही गड स्वाधीन करण्यास तयार आहोत आणि शरणागती व तहाच्या बोलणीकरिता गड उतरून आम्ही आपल्या छावणीत येणार आहोत आणि ह्याच भरोश्यावर सिद्दी जौहर गाफील राहिला.आता इथे आणखी एक मुद्दा स्पष्ट करायला हवा आणि तो म्हणजे शिवा न्हावी काशीदचा. शिवाजी राजांनी शिवा नावाच्या एका  न्हाव्याला खोटा शिवाजी बनवून जौहर कडे पाठवले आणि त्याने काही वेळ सोंग धरून छावणी गाफील ठेवली पण पुढे जौहरला समजले की हा खोटा शिवाजी आहे आणि तो मारला गेला अशी एक अख्यायिका लोकप्रसिद्ध आहे इतकेच नव्हे तर या आधारे नेबापूर गावी शिवा काशीद यांची स्थापलेली एक समाधी देखील आज दाखवली जाते आणि पन्हाळगडावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा ही उभारण्यात आला आहे.
आता ही अख्यायिका आली कुठून ?  तर पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये एक व्यापारी होता ज्याने आपल्या दुसऱ्या व्यापाऱ्याला वेंगुर्ल्याला पत्र लिहिले की ‘आम्ही असे ऐकले की शिवाजी ने शिवा नावाचा एक न्हावी सोंग घेवून पाठविला आणि त्यामुळे छावणी गाफील राहिली ‘ आणि ह्या दुसऱ्या व्यापाऱ्याकडून ही गोष्ट डचांना कळली आणि त्यांनी ती ऐकीव माहिती डाग रजिस्टर मध्ये नोंदवून ठेवली पण इतिहासातील कुठल्याही साधनात शिवा काशीदचा साधा उल्लेख ही येऊ नये ? त्याच्या वंशजांना दिलेले एकाही वर्षासन, जहागीर, वतनपत्र, भोगवटा किंवा निदान त्यांनी केलेली मागणी असे काहीही मिळत नाही. इतिहास मौन बाळगतो आणि त्यामुळे ह्या प्रकरणावर विश्वास ठेवता येत नाही.
आता ह्या घडल्या प्रसंगात कुठेही खिंड नाही, लढाई नाही.
मग प्रश्न असा पडतो की युद्ध कधी आणि कुठे झाले आणि बाजी प्रभू लढले आणि पडले ती जागा तरी नेमकी कोणती ?
शिवाजी राजांनी ७ प्रहरात म्हणजे २१ तासात ५ योजन म्हणजे ४० मैल अंतर कापीत विशालगड गाठला. हेरांकरवी जेव्हा ही बातमी सिद्दी जौहरला समजली तेव्हा त्याने आपला जावई आणि सेनापती सिद्दी मसूद याला सांगितले की – जरी शिवाजी राजे विशालगडावर पोहोचले असले तरी ते फार काल तिथे राहणार नाहीत तेव्हा तु लवकरात लवकर विशाळगडाकडे रवाना हो. सिद्दी मसूद येत असल्याची बातमी शिवाजी राजांना समजली आणि त्याच्याशी लढण्याकरिता शिवाजीराजांनी आपले सैन्य विशाळगडावरून खाली उतरवले आणि विशाळगडाच्या पायथ्याशी घोर रणकंदन माजले. या विजापुरी सैन्यात मसूद बरोबर पालीचे यशवंतराव आणि शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वेही होते. शिवाजीराजांनी पाठवलेल्या सैन्याचे नेतृत्व बांदलांचा सरनोबत बाजी प्रभू देशपांडे याच्याकडे होते आणि या युद्धात मराठा सैन्याने विजापुरी सैन्याचा पराभव केला पण याकरिता त्यांना आपले एक नररत्न गमवावे लागले, बाजी प्रभू देशपांडे या युद्धात कामी आले, आता प्रश्न असा की बाजी प्रभू लढले आणि पडले ती जागा तरी नेमकी कोणती ? सर्व पुरावे पाहता आणि विशेषत: शिवभारतात असलेले वर्णन पाहून असे स्पष्ट होते की बाजीप्रभू हे विशालगडाच्या पायथ्याशी लढले आणि कामी आले.  केवळ शिवभारतातच नव्हे तर बांदल घराण्यात मिळालेली तकरीर देखील स्पष्ट उल्लेख करते की युद्ध विशालगडला पोहोचल्यानंतर झाले आणि बाजी त्यात कामी आले. किल्ले विशाळगडाच्या पायथ्याशी हे युद्ध झाले असावे आणि त्याच्या संभाव्य बलिदानाच्या जागेचे छायाचित्र प्रथमच इथे उपलब्ध करून देत आहोत.

बाजी पावनखिंडीत पडले असे, ९१ कलमी आणि शिवदिग्विजय बखर नमूद करतात.
९१ कलमी बखरी मध्ये कलम क्रमांक ३९ बाजीप्रभू – त्याउपर विशालगडच्या मागे पाई चालता चार कोस गड उरला तो प्रातःकाल जाला. तो फौज रातोरात चंद्रज्योती लाऊन माग काढीत फौज पाठीवर कुल लागली. ते समइ बाजीप्रभू देशकुलकर्णी हिरडस मावलकर धारकरी राजे यांस म्हणो लागले, जे तुम्ही निम्मे लोक घेऊन गडावर जाताच (=पोचताच) तोफेचा आवाज करणे. तोपावेतो या खिंडी मध्ये आपण निमी मावले घेऊन दोन प्रहर पावेतो पाठीवर फौज येऊ देत नाही. साहेबी निघोन जाणे. आपण साहेब कामावर मरतो. पुढे मुलांस अन्न देणे. ऐसे म्हणोन बाजी प्रभू उभे राहोन राजे यांस वाटे लाविले. तो फौज फाजील खान व सर्जा खान, कुल सरदार येऊन खिंडीस येवोन भाडो लागले. वीस हजार मावले व बाजी प्रभू यांनी बहुत युद्ध केले. प्रहर दिड प्रहर पावेतो फौज खिंड चढो दिली नाही. तो राजे गडावर जाऊन, तोफ मोठी सोडून आवाज दोन तीन करिता, बाजी प्रभू म्हणो लागले, जे याउपर जीव गेला तर काही धोका नाही. याउपर फौजेचे प्यादे कानडे मागून आले त्यांनी मोड केला. मावले खिंडीतून मारून काढिले. पलोलागले ते समइ बाजी प्रभू उभे राहोन भांडण बहोत जाले. बाजीप्रभूस जखमा जोरावर लागल्या, त्या स्छली पडिले. पडता मावले काही मेले. काही डोंगरात सांभाळून पळाले. भोजगडा खाले गोणीमुट तेथे प्रहर पावेतो उभी राहिली. त्या स्छ्ली पाणी नाही. कोंकण कुबल जागा देखोन याउपर सिवाजी सापडत नाही. येथे अगर पनाला राहिल्या फौजेवर छापा घालून बुडविल हा विचार करून माघारे फौज कुल घेऊन विजापुरास वेढा काढून गेले.
९१ कलमी बखरीतील काही कलमे उत्तरकालीन आहेत, त्यामुळे त्यातील असणाऱ्या माहिती मधे तफावत आढळते, त्यात महाराजांसोबत २०,००० मावळे असल्याची नोंद आहे, खिंडीचा उल्लेख आहे पण ती गजापूर गावानजीकची घोडखिंड आहे असा उल्लेख नाही (इथे संशय निर्माण होतो) भौगोलिकरित्या पाहता पन्हाळ्या वरून विशाळगडाकडे जाण्याचा जो मार्ग आहे  त्या मार्गाने येताना गजापुरची खिंड उतरावी लागते चढावी लागत नाही. जेधे करीन्यामधे गजापुरचे घाटी, पुढे गनिमास चढू दिले नाही असा  उल्लेख आहे.दोन्ही नोंदी पाहता त्यात एक समानता आढळते, त्यात शत्रूस चढू दिले नाही असा उल्लेख मिळतो. या वरून काय समजावे ?
जेधे शकावली जागा स्पष्ट करीत नाही. अस्सल पत्रे, सभासद बखर आणि शिवभारत यात हा प्रसंगच नाही आणि  बांदल तकरीरीत बाजी बांदल सैन्यासह विशाळगडावरून मसूद वर चालून गेले आणि मारले गेले  असा उल्लेख आहे, तो आपण पाहूयात
श्री.ग.ह.खरे आणि श्री.ना के जोशी संपादित बांदल तकरीर त्यातील मजकूर इथे पुढे देत आहे,
- त्याउपरी शास्ताखान पुनियास आला. पुढे महाराज किल्ले विशालगडास गेले त्याबरोबर आपले आजे रायाजी नाईक बांदल व बाजीप्रभू देशपांडे सरनोबत लोक होते त्यास किल्ले विशालगडास नामजाद होऊन किले पनालियास बेबुदीकारणे (बेबुदी म्हणजे मजबुती करणे) गेले. तो सिधी जोहर विजापुराहून फौजेनिसी आला, महाराज विशालगडास आले मागे गनीम आला महाराजांनी कुल जमाव उतरीला तेव्हा रायाजी नाईक यासी बोलावले आणि हुकुम फरमाविला  तुम्ही व सरनोबत (म्हणजे बाजीप्रभू देशपांडे) लोक घेऊन युद्धास जाणे गनीम जोरावर राहता नये म्हणून हुकुम केला, त्यास बाजीप्रभू सरनोबत यांही अर्ज केला कि रायाजी नाईक नेणते आहे संतती जाली नाही आम्ही व लोक साहेब कामावरी आलो या उपरी निदान आले मागे कबिले आहेत त्यांचे व रायाजी नेणता आहे याचे उर्जित करणार महाराज  धनी आहे म्हणून रायाजी नाईक यासी हाती देऊन पायावरी डोई ठेवून जमाव सुधा गडाखाली उतरले युद्ध तुंबल  जाले गनीम मारून काढीला ते समई बाजीप्रभू व लोक साहेब कामावरी पडिले हे वर्तमान महाराजांनी आपल्या नद्रेने पहिले, ऐसे वर्तमान जाले तेव्हा रायाजी नाईक यांनी अर्ज केला कि बाजीप्रभू सरनोबत व लोक पडिले त्यास विल्हे लावयासी जावे लागते तेव्हा महाराजांनी भले लोक बरोबर देऊन रायाजी नाईक यासी पाठवले मागे बहुत खेद केला तो लिहिता पुर्वत नाही.
शिवभारतही  सांगते - लढाई विशाळगडाच्या पायथ्याशिच झाली, शिवभारत समकालीन आहे. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की बाजीप्रभूच्या बलिदानाचा उल्लेख शिवभारतात का नाही ? कारण ते नायकाचे म्हणजे शिवाजी महाराजांचे चरित्र आहे आणि बरेच महत्वपूर्ण आसामी यातून गायब आहेत जसे कान्होजी जेधे, बाजी प्रभू देशपांडे इतकेच नव्हे तर चक्क शिवपुत्र शंभूराजांचा उल्लेख शिवभारतात नाही. पण या सर्व आसामींना प्रत्यंतर पुरावे मिळतात जे शिवा काशीद प्रकरणात मिळत नाहीत.जेधे घराण्याची तर सर्वात जास्त पत्रे प्रकाशात आली आहेत आणि उपस्थित चर्चेत बाजी प्रभू देशपांडे यांचेही उल्लेख आहेत. इतकेच नव्हे तर विशाळगडहून राजगडाच्या वाटेवर महाराजांचा तळ हिरडस मावळातील कसबे सिंध येथे पडला, हे बाजींचे जन्मगाव ! आणि महाराजांनी दिपाऊ बांदल हिस बोलावून घेतले, तिचे बहुत प्रकारे समाधान करून महाराज म्हणाले – ‘ तुझा बाजी परभू देशपांडे सरनोबत व लोक पडिले त्यांचे समाधान करणे साहेबास आहे, त्यांच्या घरी जावे लागते ‘. महाराज स्वत: चालत बाजी प्रभूंच्या घरी गेले, बाजींना २ स्त्रिया व ८ पुत्र होते त्यांचे सांत्वन केले. बाजींची सरदारी त्यांनी त्यांच्या बाबाजी नामक पुत्रास दिली व सात भावाना पालखीचा मान देवून तैनाती करून दिल्या तसेच कुल प्रभू लोकांना गडावर कारखानीसी वतन दिले तर बांदलांना तरवारीच्या पहिल्या पानाचा मान राजांनी दिला !
विशाळगडावर बाजींची समाधी सापडल्याचे सर्वश्रुत आहेच, जर हे सत्य असेल आणि ती समाधी खरोखर बाजींची असेल तर बाजींचे प्राणोत्क्रमण विशालगडाच्या आसमंतात झाल्याचे अधिक संभवते. एक नक्कीच की बाजी जर पावन/घोड/गजापूर खिंडीत पडले असते तर महाराजांनी निश्चितच त्यांचे स्मारक उभारले असते कारण प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे आणि सूर्यराव काकडे यांची स्मारके शिवकालीन आहेत. नरवीर बाजी प्रभूंच्या हौतात्म्याला मानवंदना करीतच त्या गुढ इतिहासातील सत्य जाणण्याचा हा केवळ एक प्रांजळ प्रयत्न.